spot_img
spot_img
spot_img

“आम्ही इथले भाई आहोत…” म्हणत तरुणांवर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

खेड तालुक्यातील येलवाडी परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका” अशी धमकी देत चौघांनी तिघा तरुणांवर दांडके, विटा आणि लाथाबुक्क्यांनी बेछूट मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ११ मे २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास येलवाडी गाव हद्दीत हॉटेल इंद्रायणी समोरील मोकळ्या जागेत घडली. फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील ओळखीतील आकाश ढेरंगे व प्रशांत जाधव यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून संतप्त झालेल्या आरोपींनी संगनमत करून तिघांवर हल्ला चढवला.

या प्रकरणात तोहीत इनामदार, सार्थक पाडळे, आशिष माने आणि सिद्धार्थ लांघे (सर्व रा. देहुगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार आरोपींनी फिर्यादी, आकाश ढेरंगे आणि प्रसाद म्हस्के यांना हातातील लाकडी दांडके, विटा तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीला तसेच उजव्या पायाच्या नडगीला फ्रॅक्चर झाले. आकाश ढेरंगे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून चार टाके पडले, तर प्रसाद म्हस्के यांच्या पायालाही फ्रॅक्चर झाले.

हल्ल्यानंतर आरोपींनी हातातील दांडके हवेत फिरवत मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. “आम्ही येथील भाई आहोत” असे म्हणत जमलेल्या नागरिकांनाही धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

जखमी फिर्यादीवर उपचार सुरू असल्याने प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ११८(१), ११५, ३५१(२), ३(५) तसेच क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी क्रमांक २, ३ आणि ४ यांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी तोहीत इनामदार हा फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!