spot_img
spot_img
spot_img
spot_img

मानवतावादी वैद्यकीय सेवेवरच समाजाचा खरा विश्वास – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘कोणताही व्यवसाय केवळ पैसा कमावण्यासाठी करणे सोपे असते; मात्र त्याचे रूपांतर समाजसेवेत करणे अवघड असते. मानवतेच्या भावनेतून निष्ठापूर्वक केलेली व्यावसायिक सेवा समाजाचा विश्वास वाढवते,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले.

अत्याधुनिक नेत्रसेवेच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’चे विश्वविख्यात क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. संध्याकाळी झालेल्या औपचारिक उद्घाटन समारंभात न्या. चंद्रचूड बोलत होते.

पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाला नारायण नेत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. नरेन शेट्टी, पद्मश्री तथा ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विकास महात्मे, ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. विद्याधर वैद्य, नामवंत सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य, कॅटॅरॅक्ट व रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. तन्मय वैद्य, व्हिट्रिओरेटिनल सर्जन डॉ. करिश्मा तेंडुलकर, डॉ. तेजल तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. शंतनू गोखले यांनी सादर केलेल्या ‘सुरो का नूर संतूर’ या सांगीतिक मैफलीने उपस्थितांची दाद मिळवली.

सर्वसमावेशक नेत्रालय

पुण्याच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेले ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’ हे केंद्र सर्वसमावेशक, नैतिक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रसेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. नवजात बालकांच्या रेटिनल तपासणीपासून बाल नेत्रसेवा, मायोपिया मॉनिटरिंग, ड्राय आय उपचार, रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी मूल्यांकन, डायबेटिक रेटिनोपॅथी व्यवस्थापन, ग्लॉकोमा तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि प्रगत रेटिनल उपचार अशा विविध सेवा येथे उपलब्ध असणार आहेत.

डोळे आणि दृष्टी

डॉ. चंद्रचूड म्हणाले, ‘‘डोळे आणि दृष्टी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. डोळे हे केवळ पाहण्याचे माध्यम नसून ज्ञान, मन आणि बुद्धी यांच्या साहाय्याने खरी दृष्टी प्राप्त होत असते. रुग्णांना दृष्टी देण्याचे कार्य ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’च्या माध्यमातून घडेल, याची खात्री वाटते. न्यायव्यवस्था आणि वैद्यकीय व्यवसाय यांच्यातील समान धागा म्हणजे विश्वास. लोकशाही न्यायालयावरील विश्वासावर उभी आहे, तर वैद्यकीय क्षेत्र रुग्णांच्या डॉक्टरांवरील विश्वासामुळे टिकून आहे. वैद्य कुटुंबाने आपल्या कार्यातून हा विश्वास संपादन केला असून, डॉ. तन्मय वैद्य आणि डॉ. करिश्मा तेंडुलकर हा वारसा अधिक समृद्ध करतील.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय तरुणांकडे उच्च दर्जाचे ज्ञान आणि अत्याधुनिक कौशल्य आहे. पारंपरिक ज्ञानासोबत नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून जागतिक स्तरावरील उत्कृष्टता साध्य करता येऊ शकते. प्रत्येक व्यवसायात प्रलोभने असतात; मात्र विवेक, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी यांची जपणूक करणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीसोबत मानवी संवेदना आणि आपुलकी तितकीच महत्त्वाची असते.’’

संत कबीर यांच्या दोह्याचा दाखला

संत कबीर यांच्या ‘गुरु गोबिंद दोऊ खड़े…’ या दोह्याचा उल्लेख करताना डॉ. चंद्रचूड म्हणाले, ‘‘ज्ञान आणि कौशल्य हे गुरूंकडूनच आत्मसात होत असते. डॉ. तन्मय वैद्य आणि डॉ. करिश्मा तेंडुलकर यांनी नारायण नेत्रालयातील डॉ. नरेन शेट्टी आणि डॉ. तेजल यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकसित केले आहे. त्याचा लाभ भविष्यात रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होईल.’’

डॉक्टरांकडे संवेदनशील मन महत्त्वाचे – डॉ. महात्मे

डॉ. विकास महात्मे म्हणाले, ‘‘आरोग्य व्यवस्था असो किंवा न्यायपालिका, प्रत्येक गोष्ट विश्वास या पायावर उभी असते. आधुनिक उपचारपद्धतींसोबत संवेदनशील मन आणि रुग्णांविषयी आपुलकी आवश्यक आहे. ज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कौशल्यही महत्त्वाचे असून ते सातत्यपूर्ण सरावातून विकसित होते. डॉ. तन्मय वैद्य आणि डॉ. करिश्मा तेंडुलकर यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.’’

नेत्र सेवेत भारत आघाडीवर – डॉ. नरेन शेट्टी

डॉ. नरेन शेट्टी म्हणाले, ‘‘भारतीय डॉक्टर नेत्रसेवेत जगभरात आघाडीवर आहेत. अत्याधुनिक तपासणी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानामुळे उपचारांची गुणवत्ता वाढली आहे. अल्पावधीत डॉ. तेंडुलकर आणि डॉ. वैद्य यांनी नेत्रसेवेत उल्लेखनीय कौशल्य आत्मसात केले असून, त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे.’’

यावेळी डॉ. तन्मय वैद्य आणि डॉ. करिश्मा तेंडुलकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अत्याधुनिक नेत्रउपचार प्रणालीची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. तन्मय वैद्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!