spot_img
spot_img
spot_img

जमीन मोजणीच्या वादातून बेबड ओहळमध्ये तुफान राडा; काठी-दगडाने मारहाण

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे जमीन मोजणीच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचला असून, एका शेतकऱ्यावर काठी आणि दगडाने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मौजे बेबड ओहळ येथील मिळकत क्रमांक १७८ (सिटी सर्व्हे क्रमांक ८७) मध्ये घडली. फिर्यादी भुषण बबनराव जगताप (वय ४०, व्यवसाय शेती व व्यवसाय) हे जमीन मोजणीच्या कामानिमित्त संबंधित ठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत थेट हल्ला चढविला.

आरोपी दत्ता भिकू सावंत, माया दत्ता सावंत आणि धीरज दत्ता सावंत यांनी मिळून फिर्यादीच्या अंगावर धावून जात हाताने, काठीने तसेच दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला, नाकाच्या हाडाला तसेच डाव्या पायाच्या अंगठ्याजवळ गंभीर आणि किरकोळ दुखापती झाल्या.

याचवेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या आई-वडिलांसह चुलते आणि चुलती यांनाही शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी फिर्यादींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) तसेच भादंवि कलम ३२४, ३२५, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार भोसले करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!