पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
महाळुंगे परिसरात अपघातग्रस्त महिलेला मदत करून रुग्णालयात दाखल करणाऱ्या युवकावरच चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवीगाळ, दगडफेक आणि काठीने मारहाण करत आरोपींनी संबंधित युवकाला गंभीर जखमी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुजलॉन कंपनीसमोर, महाळुंगे येथे घडली. फिर्यादी हर्षल उल्हास शेप (वय ३६, रा. मोशी, पुणे) हे खासगी कंपनीत काम करीत असताना कंपनीच्या ड्रायव्हरने त्यांना फोन करून कंपनीच्या ट्रकसमोर अपघात झाल्याची माहिती दिली.
फिर्यादी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, मोटारसायकल घसरून पडल्याने मंदाकिनी पांडुरंग गुंजाळ (वय ४२, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) या जखमी अवस्थेत खाली पडलेल्या दिसून आल्या. मानवतेच्या भावनेतून फिर्यादी आणि आरोपी सुमीत गुंजाळ यांनी मिळून संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यानंतर घटनास्थळी परतल्यानंतर आरोपी सुमीत गुंजाळ आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांनी अचानक फिर्यादी व त्यांचे मावसभाऊ गोपाळ लहाने यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ सुरू केली. काही वेळातच हा वाद हिंसक झाला आणि आरोपींनी दगडफेक करत फिर्यादीचा पाठलाग सुरू केला.
फिर्यादी सुजलॉन कंपनीच्या परिसरात आश्रयासाठी पळून गेले असता आरोपी तेथेही घुसले. आरोपींनी फिर्यादीचा शर्ट पकडून त्यांना बाहेर ओढत आणले. यावेळी आरोपी सुमीत गुंजाळ याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ जोरात मारला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने लाकडी काठीने फिर्यादीच्या पायावर वार करत त्यांना जखमी केले.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपी सुमीत गुंजाळ आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रेंगडे करीत आहेत.


