सदगुरू हॉटेलजवळ सुरू होता जुगार अड्डा; रोख रक्कम व मटका साहित्य जप्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
महाळुंगे परिसरात सुरू असलेल्या अवैध ‘मुंबई मटका’ जुगार अड्ड्यावर दक्षिण महाळुंगे पोलिसांनी धाड टाकत दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास मौजे महाळुंगे गाव हद्दीतील सदगुरू हॉटेलजवळील मोकळ्या जागेत काही जण मुंबई मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी गोपालसिंग सिद्धुसिंग गौंड (वय ४६) आणि अशोक लोटन राय (वय ३६) हे लोकांकडून पैसे घेऊन मुंबई मटका जुगार खेळविताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ हजार ६८० रुपयांची रोख रक्कम तसेच मटक्याचे साहित्य जप्त केले.
दोन्ही आरोपी मूळचे मध्यप्रदेश राज्यातील असून सध्या महाळुंगे परिसरात भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावली असून पुढील तपास पोलीस हवालदार भास्कर करीत आहेत.


