spot_img
spot_img
spot_img

दारूच्या नशेत पतीचा हैदोस; पत्नी व मुलावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला

रुपीनगर परिसरातील मध्यरात्रीची घटना; चिखली पोलिसांकडून आरोपी पती अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तळवडे येथील रुपीनगर परिसरात कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही घटना रविवारी (दि.१० मे) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास गायकवाड बिल्डिंग, इंद्रायणी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. याप्रकरणी मानसी सुभाष उत्तेकर (वय ४०) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानसी उत्तेकर या पती सुभाष केशव उत्तेकर आणि मुलगा ज्ञानेश्वर यांच्यासह घरी होत्या. त्यावेळी आरोपी सुभाष उत्तेकर हा दारूच्या नशेत घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे मानसी यांनी घरातील लाईट बंद करून त्याला झोपण्यास सांगितले. मात्र, याच कारणावरून आरोपी संतापला.

संतप्त झालेल्या आरोपीने घरातील पट्ट्याने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर कोणत्यातरी धारदार वस्तू अथवा हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार केला. आरोपीचा राग इतक्यावरच थांबला नाही. त्याने मुलगा ज्ञानेश्वर याच्यावरही हल्ला करत त्याच्या हनुवटीवर, खांद्यावर, गळ्यावर आणि हातावर वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सुभाष उत्तेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे रुपीनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!