spot_img
spot_img
spot_img

“सोसायटीच्या गेटवरच उभा होता सैतान!” मोशीत सुरक्षा रक्षकाकडून चिमुकल्यांवर अत्याचाराचा प्रयत्न

चार मुलींशी अश्लील वर्तन, आरोपी गजाआड

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा एकदा संतापजनक घटनेने हादरले असून, मोशी परिसरातील एका नामांकित सोसायटीत सुरक्षा रक्षकानेच चार निष्पाप चिमुकल्यांशी अश्लील वर्तन करत अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीचा सोसायटीतील हा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी त्याने आपल्या विकृत मानसिकतेचे भयावह रूप दाखवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश चौधरी हा संबंधित सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामावर रुजू झाला होता. रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या व्यक्तीनेच पाच ते दहा वर्षे वयोगटातील चार चिमुकल्या मुलींना लक्ष्य केले. मुलींना एकटे पाहून त्यांच्याशी अश्लील वर्तन करत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेतील एका दहा वर्षीय मुलीने मोठे धाडस दाखवत आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या सांगण्यावरून पालक हादरले आणि तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दिनेश चौधरी याला अटक केली.

या प्रकारामुळे मोशी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “ज्याच्यावर मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली, तोच भक्षक निघाला,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वाढत्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नसरापूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता मोशीतील हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांशी नियमित संवाद ठेवणे, ‘गुड टच-बॅड टच’ची माहिती देणे, तसेच मुलांच्या वागण्यात होणारे बदल गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण आता धोका केवळ निर्जन रस्त्यांवर नाही, तर घराजवळ आणि सोसायटीच्या गेटवरही दबा धरून बसला आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

“चिमुकल्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी नाही… अशा नराधमांना फक्त कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भावना संतप्त पालकांकडून व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!