spot_img
spot_img
spot_img

“माझ्या नावाचा गैरवापर करून ठराव मंजूर”; संदीप वाघेरे यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मनपा आयुक्त तसेच स्थायी समिती सभापती यांना निवेदन देत स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६, विषय क्रमांक ७ बाबत गंभीर आक्षेप नोंदविला आहे. आपल्या नावाचा गैरवापर करून ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे. दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये मा. शिक्षण समिती सभा ठराव क्रमांक ७ दिनांक ०२ एप्रिल २०२६ अन्वये नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या डॉकेटनुसार संबंधित विषयात नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव “सूचक” म्हणून तर विकास साने यांचे नाव “अनुमोदक” म्हणून नमूद करण्यात आले होते.

मात्र, आपण संबंधित विषयास कोणतीही संमती दिलेली नसून कोणताही ठराव सुचविलेला नाही, असे स्पष्ट करत वाघेरे यांनी नगरसचिव कार्यालयाकडून दिशाभूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आपल्या नावाची करण्यात आलेली नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासोबतच संबंधित विषयात यंत्रमाग आणि जगदंब या दोन्ही संस्था शासनाच्या असतानाही जगदंब संस्थेच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या फरकामुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रति विद्यार्थी व प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

  • स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६, विषय क्रमांक ७ तात्काळ रद्द करण्यात यावा
  • त्यांच्या नावाची चुकीची नोंद रद्द करण्यात यावी
  • संबंधित प्रकरणात दिशाभूल करणाऱ्या नगरसचिव व संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!