spot_img
spot_img
spot_img

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा (डीपीयु) 17 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ  उत्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी मा. श्री. ज्योतिरादित्य एम. सिंधिया, केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री, भारत सरकार हे पाहुणे म्हणून  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. पी. डी. पाटील कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे यांनी भूषविले.

या कार्यक्रमात मा. डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) माजी प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे  आणि माजी अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे तसेच मा. डॉ. ए. एल. काकराणी  वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात प्राध्यापक तसेच संचालक – शैक्षणिक सहयोग विभाग डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे. या दोन दिग्गज व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन गौरविण्यात आले.

या समारंभात विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 18,720 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली असून यामध्ये 48 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 16,752 पदव्युत्तर पदवी, 1,905 पदवी व 15 पदविका या अशा एकूण 9 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 

यावेळी मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे),   मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील (प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे), मा. डॉ. एन. जे. पवार (कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे),  मा. डॉ. सौ. स्मिता जाधव (प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) तसेच  मा. डॉ. यशराज पी. पाटील (विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) यांच्यासह इतर मान्यवर, प्राध्यापक सदस्य, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

 ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले – आज पदवीदान समारंभात शैक्षणिक वस्त्र परिधान करून उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहताना मला विकसित भारत २०४७ चे भावी शिल्पकार दिसत आहेत. विकसित भारत २०४७च्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचे नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावे. पदवीदान समारंभ हा शेवट नसून, तो आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे मिळालेले शिक्षण, संस्कार आणि अनुभव तुम्हाला आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची, बदलांना सामोरे जाण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्याची ताकद देतील.

आज भारत एका ऐतिहासिक व निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आरोग्यसेवा, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये अफाट संधी उपलब्ध आहेत. मी प्रत्येक विद्यार्थ्याला आवाहन करतो की, केवळ नोकरीचा विचार करू नका, तर आपल्या कार्यातून समाजावर आणि देशावर काय सकारात्मक प्रभाव पडेल याचाही विचार करा. धाडसाने जोखीम घ्या, सातत्याने नवे शिकत राहा, आपल्या संस्थेशी कायम जोडलेले राहा आणि आपल्या या यशस्वी प्रवासामागे असलेल्या पालक व शिक्षकांचे योगदान सदैव स्मरणात ठेवा.

स्वतःसाठी काहीतरी अर्थपूर्ण उभारा, इतरांसाठीही काहीतरी घडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — मातृभूमी भारतासाठी काहीतरी महान निर्माण करा.”

एक भारत श्रेष्ठ भारत आणि विकसित भारत २०४७ ही आपली विचारधारा आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १४० कोटी भारतीयांचे योगदान आवश्यक आहे. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि २०३० पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चंद्रावर तिरंगा फडकवणारा भारत आता जगाला दिशा देत आहे. चांद्रयान, आदित्य एल-१ यांसारख्या मोहिमांनी भारताची क्षमता सिद्ध केली आहे. 

मा. डॉ. पी. डी. पाटील म्हणाले – ” पदवीप्रदान समारंभ हा संपूर्ण ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ’ परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 2003 मधील स्थापनेपासून आजवर, हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता, नवनवीन प्रयोग (Innovation), आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असलेले एक बहुविद्याशाखीय केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. भारतीय मूल्यांची जोपासना करत जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या ध्येयानेच आमच्या या प्रगतीची वाटचाल झाली आहे.

आज पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. आपल्या व्यावसायिक आयुष्यात पाऊल टाकत असताना, मी तुम्हा सर्वांना असे आवाहन करतो की, तुम्ही तुमची कौशल्ये सातत्याने विकसित करावीत, आपली क्षमता विस्तारत राहावी आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी पूर्ण निष्ठेने आणि सार्थ हेतूने करावा.”

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!