spot_img
spot_img
spot_img

रंगरेषांतून उजळली प्रतिभा! एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विवान पाटीलला राष्ट्रीय स्तरावरील ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’

पिंपरी, पुणे (दि. ७ मे २०२६) — लहान वयातच आपल्या कल्पकतेची आणि कलात्मक प्रतिभेची झलक दाखवत रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत कार्यरत एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विवान पाटील याने राष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणारा ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’ पटकावून शाळेचे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

पुण्यातील कलादर्पण संस्था यांच्या वतीने दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या चौथ्या राष्ट्रीय कलादर्पण चित्रकला स्पर्धेत देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय स्तरावर अवघ्या २२ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये ११ विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचा ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या मानाच्या पुरस्कारात स्मृतिचिन्ह आणि सायकल भेट देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार मिळवणारा एस. बी. पाटील पब्लिक स्कूल चा पहिलाच विद्यार्थी ठरल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विवानच्या यशामागे त्याची मेहनत, सर्जनशीलता आणि चित्रकला शिक्षक कुलदीप घाडगे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विवानने आपल्या चित्रांमधून कल्पनाशक्ती आणि रंगसंगतीचा अनोखा आविष्कार सादर केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विवानचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लहान वयात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कला क्षेत्रातही पिंपरी-चिंचवडची मुले आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!