शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षात दर्जेदार शालेय साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच हे काम अंध, अपंग व दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर केले असून, श्री. जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी व वितरणाचे काम देण्याची शिफारस केली आहे. ही संस्था अंध, अपंग व दिव्यांग नागरिकांसाठी कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याचे भोईर यांनी नमूद केले आहे.
गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल
महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्यामुळे शैक्षणिक साहित्य वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण समितीच्या माध्यमातून मनपा शाळांचा दर्जा खासगी शाळांप्रमाणे उंचावण्याचा प्रयत्न सुरू असून, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि पटसंख्या वाढविणे हे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन शैक्षणिक वर्ष जून २०२६ पासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १५ जूनपासून साहित्य वाटप होणे आवश्यक असल्याचे भोईर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
शासन दरनिश्चितीनुसार साहित्य खरेदीची मागणी
महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा व उद्योग विभागाच्या १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार तसेच २७ सप्टेंबर २०२३ रोजी निश्चित करण्यात आलेल्या दरनिश्चितीनुसार शालेय साहित्य खरेदीचे आदेश निर्गत करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना दोन नियमित शालेय गणवेश, दोन पी.टी. गणवेश, ओढणी, स्वेटर, वेस्टकोट, सॉक्स, रेनकोट, दप्तर, टाय, लेग्गीस, नॅपकिन, हेअर बँड, रिबीन आदी साहित्य देण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, शासन निर्णयानुसार अंध, अपंग व दिव्यांग संस्थांसाठी अशा वस्तूंची खरेदी राखीव असल्याने संबंधित संस्थेमार्फत साहित्य खरेदी केल्यास शासनाने निश्चित केलेल्या दर्जानुसार विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे साहित्य मिळेल, असा दावा भोईर यांनी केला आहे.
सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न
श्री. जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित ही संस्था दिव्यांग नागरिकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून उत्पादित साहित्याला महापालिकेच्या स्तरावर संधी दिल्यास सामाजिक बांधिलकी जपली जाईल, असे भोईर यांनी म्हटले आहे.
महापालिकेने या संस्थेला काम दिल्यास एका बाजूला गरीब विद्यार्थ्यांना वेळेत व दर्जेदार शालेय साहित्य मिळेल, तर दुसऱ्या बाजूला अंध, अपंग व दिव्यांग नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या सक्षमीकरणालाही चालना मिळेल. त्यामुळे महापालिकेच्या सामाजिक प्रतिमेत भर पडून शहराच्या नावलौकिकात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना साहित्याचे वेळेत वितरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही भोईर यांनी केली आहे.



