मावळ मतदारसंघातील विकास कामांचा आढावा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)कडून पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात लगत परवानगी दिलेल्या सोसायट्यांची पाहणी करावी. एसटीपी चालू आहेत की नाही हे तपासावे. थेट नदीत सांडपाणी सोडण्याऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करावेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळविण्यात यावे. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला.
पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मावळ लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा खासदार बारणे यांनी गुरुवारी आढावा घेतला. आयुक्त अभिजीत चौधरी अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस दक्षता अधिकारी अमोल झेंडे, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोलंबे, सह आयुक्त रुपाली आवले डंबे, सह आयुक्त पुनम मेहता, हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, मुख्य अभियंता अभियांत्रिकी विभाग शिवप्रसाद बागडी, रिनाज पठाण, उपसंचालक स्मिता कलकुटकी, संचालक विकास परवानगी विभाग अविनाश पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यात किल्ले आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. लोहगडवरून विसापूरकडे जाणारा रस्ता विकसित करावा. लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात यावी. भाजे लेणीपासून लोहगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे लावावेत. कारला फाटा ते मळवली हा रस्ता मंजूर असून त्याचे काम तत्काळ सुरू करावे. देहू ते येलवाडी या तळेगावला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहने जाणे कठीण झाले आहे. देहू, भंडारा डोंगर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असते. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी.
लक्ष्मी चौकातील कोंडी फोडा
भूमकर चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लक्ष्मी चौक – मारुंजी रोड परिसरात अनधिकृत विक्रेत्यांमुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी, वाकडकडून येणाऱ्या वाहनांमुळे लक्ष्मी चौकातील कोंडीत मोठी भर पडते. येथे अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर कारवाई करून चौक कोंडीमुक्त करावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.
पवना नदीवरील पुलाचे काम तत्काळ पूर्ण करा
पवना नदीच्या उगमापासून पिंपरी-चिंचवडपर्यंत नदी काठच्या गावाचे सर्वेक्षण करावे. नदी काठच्या गावात एसटीपी उभारावेत. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा. किवळे ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर महापालिका आणि पीएमआरडीएच्या वतीने पूल उभारण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील काम झाले आहे. सांगवडे हद्दीत जागा ताब्यात नाही. त्यामुळे काम रखडले आहे. जागा ताब्यात घेऊन काम मार्गी लावावे, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.
तत्कालीन नवनगर विकास प्राधिकरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार तत्काळ परतावा द्यावा. कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावले जाते. शेतकऱ्यांना तत्काळ सव्वा सहा टक्के परतावा देण्याची सूचना खासदार बारणे यांनी दिल्या.



