३६ लाखांच्या २४ मोटारसायकली जप्त
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या २४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
महाळुंगे औद्योगिक वसाहतीतील उद्योग तसेच विविध कंपन्यांमधील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी पानसे ऑटो प्रा. लि. कंपनीसमोरील पार्किंगमधून स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १४ एनसी ६४६३) अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. याप्रकरणी फिर्यादी संदीपकुमार किशोरी सरन निसाद यांच्या तक्रारीवरून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी महाळुंगे ते जुन्नर असा जवळपास ८० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासात यश सुनिल हांडे (वय १९, रा. पिंपळगाव सौदा, ता. जुन्नर) आणि किरण संभाजी जाधव (वय २६, रा. टिकेकरवाडी, ता. जुन्नर) यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे, नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातून अनेक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
या आरोपींकडून विविध कंपन्यांच्या एकूण २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ३६ लाख रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे अनेक प्रलंबित वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून औद्योगिक परिसरातील वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी मोठा आळा घातल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईचे उद्योग क्षेत्रातून तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.



