शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला व साहित्य समितीची आढावा बैठक समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील क्रीडा, कला व साहित्य क्षेत्राच्या विकासासाठी चार महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच शहराच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीस विरोधी पक्षनेते तथा समिती सदस्य भाऊसाहेब भोईर, शाम जगताप, धर्मपाल तंतरपाळे, तानाजी बारणे,योगेश लांडगे, जितेंद्र ननावरे तसेच उपआयुक्त पंकज पाटील आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
बैठकीत शहरातील नागरिक, खेळाडू, कलाकार आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकाभिमुख प्रस्ताव सादर करण्यात आले. सभापती कैलास कुटे यांच्या पुढाकारातून मांडण्यात आलेल्या या प्रस्तावांद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.
नवीन कला केंद्रांची उभारणी
शहरातील नवोदित कलाकार, विद्यार्थी व नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागांत ‘कला केंद्र’ सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या केंद्रांमधून चित्रकला, संगीत, नृत्य आणि नाट्य यांसारख्या कलांचे प्रशिक्षण दिले जाणार असून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
खेळाडूंसाठी अपघाती विमा संरक्षण
महापालिकेमार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘अपघाती विमा संरक्षण’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक खेळाडू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याने स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विमा कवच उपयुक्त ठरणार आहे. तसेच विम्याचा प्रीमियम महापालिकेमार्फत भरण्याची सूचनाही करण्यात आली.
महिलांसाठी विशेष सवलती व सुविधा
महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाच्या दृष्टीने शहरातील जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि इतर क्रीडा सुविधांमध्ये विशेष सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मासिक व वार्षिक शुल्कात सवलत तसेच महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे महिलांचा क्रीडा आणि आरोग्यदायी उपक्रमांतील सहभाग वाढण्यास मदत होईल.
क्रीडा विभागाचे नामकरण
शहराच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने क्रीडा विभागाचे ‘क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन व सांस्कृतिक विभाग’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा क्षेत्राबरोबरच कला, साहित्य, पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महापालिकेअंतर्गत पं. भीमसेन जोशी संगीत अकादमी (निगडी), सावित्रीबाई फुले अकादमी (बोपखेल), सार्वजनिक ग्रंथालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे तसेच क्रांतिवीर चापेकर वाडा (चिंचवडगाव) यांसारख्या विविध संस्थांद्वारे सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्राला चालना दिली जात आहे. या सर्व उपक्रमांना एकत्रित व सुसूत्र दिशा देण्यासाठी एकात्मिक धोरण राबविण्याची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव शहराच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या निर्णयांमुळे शहरातील खेळाडू, कलाकार आणि नागरिकांना अधिक संधी व सुविधा उपलब्ध होतील. तसेच महिलांच्या सहभागात वाढ होऊन सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. आगामी काळात या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पिंपरी चिंचवड शहराला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– कैलास कुटे, सभापती , क्रीडा, कला व साहित्य समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



