पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चाकण परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत एका युवकाकडून अवैध देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास चाकण येथील पठारवाडी रोडलगत मोकळ्या जागेत गस्त घालत असताना संशयित हालचाली आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली. यावेळी आरोपी प्रविण अशोक प्रधान (वय २२, रा. बीडवस्ती, चाकण) याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल (किंमत अंदाजे ५०,००० रुपये) आणि १ जिवंत काडतूस (किंमत १,००० रुपये) असा एकूण ५१,००० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
सदर शस्त्रास्त्र हे आरोपीकडे कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या बाळगले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तत्काळ आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८९/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे करीत असून, औद्योगिक क्षेत्र असलेल्या चाकणमध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.



