शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या ‘शेत पाणंद रस्ते’ प्रश्नावर आमदार सुनील शेळके यांनी ठाम भूमिका घेत निर्णायक पावले उचलली आहेत. वडगाव मावळ येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी तालुक्यातील विविध गावांतील पाणंद रस्त्यांची स्थिती, अतिक्रमण आणि नागरिकांच्या तक्रारी यांचा सविस्तर आढावा घेतला. अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद पडलेले रस्ते तात्काळ खुले करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. पाणंद रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शेतीकामात मोठ्या अडचणी येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर आमदार शेळके यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष जागेवर तोडगा काढण्यावर भर दिला. “नुसती चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती” हा मंत्र त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.
बैठकीस उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी घरकुल योजनेचाही आढावा घेण्यात आला असून, संबंधित समस्यांवरही त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक आणि कृतीशील भूमिका घेत, मावळ तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



