पुणे | प्रतिनिधी – युनूस खतीब
वारजे परिसरातील चैतन्य चौक येथील एका सलूनमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत निहाल शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, निहाल शिंदे हा सलूनमध्ये केस कापत असताना अचानक झालेल्या वादातून गोळीबार झाला. यावेळी गोळी त्याच्या कानाजवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या झटापटीदरम्यान अमोल आढव हेदेखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी साहिल राऊत याला ताब्यात घेतले असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.




