पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
रावेत येथील एका खासगी कंपनीच्या मालकाचा फोटो व नाव वापरून बनावट व्हॉट्सअॅप संदेश पाठवत ७० लाख रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.व्ही.एच. ग्लोबल फार्मस प्रा. लि., रावेत येथील कंपनीच्या अकाऊंटंट मनोज सपकाळ यांना कंपनीच्या मालकाच्या नावाने व डीपी लावून व्हॉट्सअॅपवर संदेश पाठविण्यात आला. आरोपींनी आयसीआयसीआय बँकेच्या दोन खात्यांमध्ये अनुक्रमे ७० लाख व ३० लाख रुपये भरण्याच्या सूचना दिल्या.
मात्र व्यवहार संशयास्पद वाटल्याने अकाऊंटंटने तत्काळ रक्कम जमा केली नाही. त्यामुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली. या प्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक व संबंधित बँक खातेदारांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.




