पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातून मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात ९ मोटारसायकली, एक लॅपटॉप आणि मोबाईल फोनचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकल प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना बोडकेवाडी फाट्याजवळ विनानंबर प्लेटची पल्सर घेऊन एक संशयित इसम आढळला. चौकशीत त्याने आपले नाव आदित्य संतोषकुमार पटेल (वय २३) असे सांगितले. पुढील तपासात त्याचा साथीदार ओम किशोर चिस्तळकर (वय १९) यालाही ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींनी चैनीसाठी व फिरण्यासाठी दुचाकी चोरी करत असल्याची कबुली दिली. त्यांच्या चौकशीत हिंजवडी पोलिस ठाण्याच्या विविध गुन्ह्यांसह वाकड आणि चिंचवड पोलिस ठाण्यातील वाहनचोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले.
हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.




