पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीडमध्ये दरोडे घालणाऱ्या कुख्यात टोळीविरुद्ध कठोर पाऊल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खुनासह दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांद्वारे दहशत माजवणाऱ्या कुख्यात योगेश ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले आणि त्याच्या टोळीवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या कारवाईस मंजुरी दिली आहे.
दौंडमधील दरोड्यानंतर तपासाला वेग
दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 435/2025 अंतर्गत दाखल प्रकरणानुसार, 11 जून 2025 रोजी बोरीबेल (ता. दौंड) येथील भापकरवस्तीमध्ये भरदिवसा पाच जणांनी दोन मोटारसायकलींवर येत एका शेतकरी कुटुंबावर हल्ला केला. सुरासारख्या धारदार शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी “जे आहे ते काढून द्या, नाहीतर संपवून टाकू” अशी धमकी देत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही, खबऱ्यांच्या मदतीने टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने सिद्धटेक-दौंड रोडवरील शिरापूर परिसरात कारवाई करत मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयितांना पकडले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये—
योगेश ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले (24)
सचिन ईश्वर भोसले (25)
गहिनीनाथ ईश्वर भोसले (27)
यांचा समावेश होता. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी—
मिलन ऊर्फ मिलींद भोसले
सोन्या ईश्वर भोसले
यांना अटक केली असून युवराज ऊर्फ धोंड्या भोसले हा अद्याप फरार आहे.
टोळीवर 18 गंभीर गुन्हे दाखल
या टोळीवर पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, सोलापूर व बीड जिल्ह्यांत मिळून 18 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. यात—
दरोडा
जबरी चोरी
घरफोडी
सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला
खुनाचा प्रयत्न
अवैध शस्त्रासह दरोडा
मारहाण करून चोरी
अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
दहशत मोडण्यासाठी MCOCAचा वापर
टोळीची वाढती दहशत लक्षात घेता आणि संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी MCOCA अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कायदेशीर मंजुरी दिली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, दौंड पोलीस स्टेशन व विशेष तपास पथकांनी संयुक्तरीत्या ही मोठी मोहीम राबवली.




