spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेचा बिसलेरी कंपनीच्या सहकार्याने बॉटल एक्सचेंज उपक्रमाला सुरुवात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी बॉटल्स फॉर चेंजसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत.  नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते प्रभावी ठरतात. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे, असे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बॉटल एक्सचेंज उपक्रमांतर्गत पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बसण्याच्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे आज महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

महापालिका मुख्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, सहायक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे तसेच बिसलेरीचे सस्टेनेबिलिटी व कॉर्पोरेट अफेअर्स संचालक के. गणेश, पूजा शिंदे, आप्पासाहेब धनवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान शहरातील  आठ शैक्षणिक संस्थांना प्लास्टिक कचरा संकलनात सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिका आणि बिसलेरी यांची भागीदारी ही पर्यावरण संरक्षणासाठी आदर्श उदाहरण आहे.

या उपक्रमामुळे लँडफिलमध्ये जाणारा कचरा कमी होऊन नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होईल. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन व पुनर्वापर ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका सातत्याने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील.

दरम्यान, महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे शहरात कचरा संकलन व पुनर्वापर याबाबत जनजागृती वाढण्यास मदत होणार असून, २०२५-२६ या वर्षात तब्बल २१९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला आहे. तसेच, देशभरात याच उपक्रमातून २८ हजार ६४५ टन प्लास्टिक कचरा पुनर्वापरासाठी पाठविण्यात आला आहे. हा उपक्रम बिस्लेरी हरित संकल्प या अभियानाचा भाग असून, प्लास्टिक पुनर्वापर, जलसंवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

शाश्वत आणि संसाधन-कार्यक्षम पिंपरी चिंचवड शहर उभारण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. बॉटल्स फॉर चेंज या अभिनव उपक्रमामुळे आपल्या प्रयत्नांना अधिक गती मिळत आहे. प्लास्टिक कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती यावर भर देत आम्ही एक सक्षम व दीर्घकालीन प्रणाली उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. नागरिकांचा सहभाग आणि संस्थात्मक सहकार्य यामुळेच हे उद्दिष्ट साध्य होणार असून, भविष्यात अशा अधिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल.

– डॉ. प्रदीप ठेंगल,  उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!