पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
सांगवी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १४ किलो गांजासह एका आरोपीला अटक केली असून, सुमारे ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयाजवळील पॉवर हाऊस परिसर, जुनी सांगवी येथे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निशांत काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत गणेश कैलास चव्हाण (वय ३०, रा. शिरूर, पुणे) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १४ किलो गांजा, एक होंडा शाईन मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ७,९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासादरम्यान आरोपीने हा गांजा विनोद ज्ञानेश्वर झरे (रा. दौंड, पुणे) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणातील विनोद झरे हा सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) तसेच २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत असून, शहरातील अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.




