पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
खेड तालुक्यातील मोई गावात किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी एकत्रित हल्ला करत व्यक्तीला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ३४०, मोई गाव हद्दीत घडली. फिर्यादी नंदकुमार भिमराव बिळकेरे (वय ४०, रा. ता. खेड, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपींनी अडवून दुपारी घडलेल्या एका किरकोळ गोष्टीवरून जाब विचारला. “तू काय बोलला?” असा सवाल करत वाद घालत आरोपींनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. आरोपी सिद्धू माडगुळी याने “तुला सोडणार नाही, कशात तरी अडकवणार” अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि फिर्यादीच्या कानाखाली मारले.
यामुळे फिर्यादी खाली पडताच आरोपी शरण अनाकल व मालश्री अनाकल यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी शरण अनाकल याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या कपाळावर जोरात प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून किरकोळ वादातून वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.




