पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हांडेवाडी परिसरात घरगुती गॅसचा अवैध साठा करून त्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०३ गॅस सिलेंडर, तसेच चारचाकी वाहन असा एकूण १० लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली. हांडेवाडी येथील ‘काव्या मल्टी सर्व्हिसेस’ या दुकानाजवळ एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला असता, दुकानात अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक तसेच ५ किलोच्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या प्रकरणी नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गॅस साठवणुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६४/२०२६ अंतर्गत अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ श्री. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक अमित शेटे व पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या अवैध गॅस साठा व काळाबाजाराविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.




