पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड : पिंपरी परिसरात तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ४:४५ वाजण्याच्या सुमारास भाटनगर येथील बिल्डिंग क्रमांक ७ जवळ, गिरजुबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रावर लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करत डोक्यावर गंभीर मारहाण केली.
या प्रकरणी अक्षय बाबू पांढरे (वय २२) यांनी फिर्याद दिली असून, राज महेश कजानिया (वय २४) आणि ऋतिक बाबू पांढरे (वय १९) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ऋतिक पांढरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपींकडून वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे फिर्यादी आणि त्यांचा मित्र विश्वास अशोक शिंदे (वय २८) हे आरोपींच्या घरच्यांना समजावण्यासाठी गेले होते. यावेळी संतापलेल्या आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
हल्ल्यानंतर आरोपींनी “आमच्या नादी लागल्यास खल्लास करू” अशी धमकी देत लोखंडी रॉड हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली आणि तेथून बौद्धनगरच्या दिशेने पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे करत आहेत.




