पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
खेड तालुक्यातील निघोजे येथील महींद्रा सर्कल परिसरात पेट्रोल पंपावरून सुरू झालेला किरकोळ वाद गंभीर मारहाणीमध्ये परिवर्तित झाल्याची घटना समोर आली आहे. लोखंडी रॉड आणि काठ्यांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५१(१), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास जय श्रीनाथ एचपी पेट्रोल पंप, महींद्रा सर्कल, निघोजे येथे ही घटना घडली. फिर्यादी भरत तुकाराम पालवे (वय ४३, व्यवसाय चालक) हे आपल्या ट्रेलरमध्ये डिझेल भरण्यासाठी पंपावर गेले होते. त्यावेळी डिझेल भरल्याचा मेसेज न आल्याने पंप कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.
हा वाद सुरुवातीला पंप मॅनेजरसमोर मिटवण्यात आला होता. मात्र नंतर रात्री फिर्यादी आणि त्यांचे मित्र जेवणासाठी जवळील हॉटेलमध्ये गेले असताना पुन्हा आरोपींनी शिवीगाळ व धमक्या दिल्या.
यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र आरोपींना जाब विचारण्यासाठी पुन्हा पेट्रोल पंपावर गेले असता, ललित यादव याने शिवीगाळ केली. त्याचा भाऊ वैद्यनाथ यादव याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर व तोंडावर वार केला. तसेच लवकुश यादव व अजय यादव यांनी काठ्यांनी इतरांना मारहाण केली. या हल्ल्यात रोहित आणि नरेश काळे यांचे हात फ्रॅक्चर झाले आहेत.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वैद्यनाथ यादव व लवकुश यादव या दोघांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करीत आहेत.




