एलएलपी स्थापन करून गुंतवणूक उकळली; बनावट हिशेब पाठवत आर्थिक गैरव्यवहार
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
भोसरी एमआयडीसी परिसरात बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली पार्टनरशिपमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ३३) यांना आरोपी साकेत प्रदीप शहा (वय ४२, रा. कोंडवा, पुणे) याने बांधकाम व्यवसायात भागीदारी करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर दोघांनी मिळून एलएलपी (Limited Liability Partnership) स्थापन केली. या माध्यमातून फिर्यादींकडून एकूण तब्बल ८० लाख ४७ हजार ३४९ रुपये गुंतवणूक करून घेतली.
मात्र, व्यवसायाच्या नावाखाली घेतलेल्या या रकमेपैकी ३६ लाख ९५ हजार ८८० रुपये आरोपीने भागीदारीच्या कामासाठी न वापरता स्वतःच्या फायद्यासाठी वळवले. यासाठी आरोपीने बनावट हिशेब तयार करून ते फिर्यादीच्या ईमेलवर पाठवले. या हिशेबात स्वतःचे वेतन, कमिशन आणि वैयक्तिक खर्च दाखवून पैशांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार सेक्टर २, स्कीम ३, इंद्रायणीनगर, भोसरी येथे फेब्रुवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला असून, याबाबत ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (४), ३५२, ३५१ (३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीसांकडून शोधमोहीम सुरू आहे.




