पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
देहूरोड परिसरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, सोन्याचे दागिने रिपेअरिंग व नवीन दागिने तयार करून देण्याच्या बहाण्याने तब्बल २६ लाख ६० हजार रुपयांची आणि ६५७ ग्रॅम सोन्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष चौक, मेन बाजार येथील ‘सुंधा ज्वेलर्स’ या दुकानात आरोपींनी नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी तसेच नवीन दागिने तयार करण्यासाठी घेतले. मात्र, ठरलेल्या कालावधीत दागिने व रक्कम परत न देता आरोपींनी दुकान बंद करून पलायन केले.
या प्रकरणात अंबालाल जिवाजी सोनी (वय अंदाजे ५६ वर्षे) व रोहित अंबालाल सोनी (वय अंदाजे ३० वर्षे, दोघे रा. विकासनगर, किवळे, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, फिर्यादीसह सुमारे ४० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी विश्वासाने दिलेले लाखो रुपयांचे सोने आणि रोकड आरोपींनी बळकावल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सदर गुन्हा दि. ०१ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला असून, दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी सायं. ३.२० वा. गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगळे करत आहेत.




