spot_img
spot_img
spot_img

क्रीडा शिक्षकांना निवडणूक व क्रीडा व्यतिरिक्त कामकाजातून तात्काळ मुक्त करा! – अरुण पाडुळे

भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून देशभर प्रसिद्ध आहे; मात्र या शहराची ओळख “क्रीडा नगरी” म्हणून निर्माण व्हावी, हे हजारो खेळाडूंचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असताना, सध्या त्यांनाच वारंवार निवडणूक व इतर प्रशासकीय कामकाजात गुंतवले जात असल्याने मैदानावर खेळाडू मार्गदर्शनापासून वंचित राहत आहेत.

जे शिक्षक मैदानावर उभे राहून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडवू शकतात, तेच शिक्षक आज कागदपत्रांच्या कामात अडकले आहेत. यामुळे अनेक होतकरू खेळाडूंच्या डोळ्यांतील स्वप्ने अपूर्ण राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी तीव्र शब्दांत प्रशासनाला आवाहन करत महानगरपालिकेच्या क्रीडा शिक्षकांना निवडणूक व इतर गैर-क्रीडा कामकाजातून तात्काळ मुक्त करावे, तसेच पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या बघता मनपा शाळांमध्ये नवीन क्रीडा शिक्षकांची भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी ठाम मागणी केली आहे.

“आज निर्णय घेतला नाही, तर उद्याचे अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार होण्याआधीच थांबतील. खेळाडू घडले तरच शहराचे नाव देश-विदेशात उज्ज्वल होईल,” असे भावनिक मत अरुण पाडुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक कुंदनभाऊ गायकवाड, नगरसेविका योगिताताई नागरगोजे, तसेच सचिनभाऊ सानप उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!