spot_img
spot_img
spot_img

माणसाला दृष्टीइतकेच दृष्टीकोन देण्याचेही कार्य महत्वपूर्ण – डॉ. आदित्य केळकर

विश्वबंधुता साहित्य संमेलनात ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ प्रदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“नेत्रतज्ज्ञ म्हणून मी लोकांना दृष्टी देण्याचे काम करतो. मात्र, चळवळीच्या माध्यमातून माणसाला दृष्टीकोन व विचार देण्याचे कामही तितकेच महत्वाचे आहे. बंधुता चळवळ गेल्या ५० वर्षांपासून समाजात समता, बंधुभाव रुजवण्याचे काम करत आहे. सामाजिक सौहार्दासह समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी हे कार्य खूप महत्वपूर्ण आहे,” असे मत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. केळकर बोलत होते. प्रसंगी केळकर यांच्यासह ऍड. प्रार्थना सदावर्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालय यांना ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. प्राचार्य पांडुरंग भोसले, कादंबरीकार प्रा. शंकर आथरे, निमंत्रक मंदाकिनी रोकडे, कार्याध्यक्ष प्राचार्या डॉ. मनीषा बोरा, स्वागताध्यक्ष शरयू पवार, कवयित्री संगीता झिंजुर्के आदी उपस्थित होते.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “आयुष्यात कधी काय गमावले याचा मी विचार केला नाही, उलट जे काही केले त्यातून भरपूर काही कमावले. बंधुता चळवळीत काम करताना गेल्या पाच दशकांत लाखो माणसांशी जोडला गेलो, याचे समाधान आहे. संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वास आयुष्यात महत्त्वाचा असतो. आपल्याला छळणारी माणसे भेटतात, पण त्याचबरोबर प्रेरणा देणारी आणि उभे करणारीही माणसे भेटतात. त्यांच्यामुळेच आयुष्य सफल होते. अशाच लोकांना सोबत घेऊन बंधुतेचा हा विचार अखेरपर्यंत तेवत ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.”

ऍड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, “तथागत बुद्धांची शांती, महात्मा फुले यांची क्रांती, महावीरांची अहिंसा, कबीरांचे सहिष्णु विचार, छत्रपती शिवाजी महाराजांची निरपेक्षता, शाहू महाराजांची समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बंधुता या मूल्यांवर आधारित हे संमेलन समाजाच्या स्वास्थ्याचे रक्षण करत आहे. आजच्या अस्थिरतेच्या काळात बंधुतेचा विचारच आपल्यासाठी आशादायक आहे. विचारी माणसांनी चिंतन करून नव्या पिढीला समतेची दिशा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी समाजसुधारकांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “गेल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या विषमतेविरुद्ध लढा देत समाजाला समतेच्या मार्गावर आणण्याचे कार्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समाजसुधारकांनी केले. त्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम अशा संमेलनांमधून होत आहे,” असे ते म्हणाले.

‘विश्वबंधुता प्रा. रा. ग. जाधव साहित्य साधना पुरस्कार’ सुधाकर वसईकर (मुंबई), अरुण पुराणिक (पुणे), वनमाला पाटील (जालना), सुनिल सातपुते (संगमनेर), पुष्पा दलाल (धामणगाव रेटावे), दिनेश मोडोकर (अकोला), वनिता चौधरी (पुणे), कपिल सावळेश्वर (नांदेड), रामदेव सित्रे (अमरावती), अरविंद झाडे (यवतमाळ) आणि प्रकाश फर्डे (शहापूर) यांना प्रदान करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. शंकर आथरे यांनी केले. प्रा. भारती जाधव, सीमा गांधी, विद्या अटक, सायली गोसावी, तुकाराम कांबळे, सुनिल बोरसे तसेच कार्यकारी समितीतील डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. सविता पाटील, प्रा. प्रशांत रोकडे यांनी संमेलनाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!