spot_img
spot_img
spot_img

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय २० मराठी चित्रपटांचा महोत्सव ; ६ ते ९ डिसेंबर काळात रसिकांना पर्वणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ‘रौप्य महोत्सवी’ वर्ष साजरे करीत असून गेल्या २१ वर्षांतील ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्काराने सन्मानित १७ चित्रपट आणि  सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे ३ चित्रपट अशा २० मराठी चित्रपटांचा महोत्सव पुण्यात ६ ते ९ डिसेंबर २०२६ या काळात प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. या प्रत्येक चित्रपटावेळी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकार उपस्थित राहणार असून, चित्रपटानंतर अर्धा तास ते प्रेक्षकांशी संवाद साधतील. या महोत्सवाचे उद्घाटन रविवार दि. ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता संपन्न होईल. महोत्सवाच्या या ४ दिवसात सकाळी ९ ते रात्री ९ मध्ये रोज ५ चित्रपट प्रदर्शित होतील.  हे सर्व चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आणि प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

गेल्या २१ वर्षातील दाखवल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटांची नावे व दिग्दर्शक पुढीलप्रमाणे. ‘शेवरी’ – गजेंद्र अहिरे, ‘टिंग्या’ – मंगेश हाडवळे, ‘गाभ्रीचा पाऊस’ – सतीश मनवर, ‘बाबू बँड बाजा’ – राजेश पिंजानी, ‘हा भारत माझा’ – सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, ‘फॅन्ड्री’ – नागराज मंजुळे, ‘किल्ला’ – अविनाश अरुण, ‘रंगा पतंगा’ – प्रसाद नामजोशी, ‘लेथ जोशी’ – मंगेश जोशी, ‘पिंपळ’ – गजेंद्र अहिरे, ‘चुंबक’ – संदीप मोदी, ‘पोरगं मजेतय’ – मकरंद माने, ‘पोत्रा’ – शंकर अर्जुन धोत्रे, ‘मदार’ – मंगेश बदर, ‘स्थळ’ – जयंत दिगंबर सोमलकर, ‘सांगळा’ – पंकज सोनावणे, ‘बाप्या’ – समीर तिवारी या शिवाय उत्कृष्ट दिग्दर्शनाचा मान मिळालेले ‘वळू’ – उमेश कुलकर्णी, ‘पुणे ५२’ – निखिल महाजन आणि ‘ख्वाडा’ – भाऊराव कऱ्हाडे हे तीनही चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) हा केवळ सिनेरसिकांसाठी पर्वणी नसून, तो मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठावर नेणारा एक मानाचा सेतू आहे. या महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (५ लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह) हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.

जगभरातील नामवंत चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शकांच्या (आंतरराष्ट्रीय ज्युरी) कसोटीवर उतरून हा पुरस्कार मिळवणे ही मोठी कामगिरी असते. या पुरस्काराची सुरुवात २००६ मध्ये झाली. समाजातील वास्तव, मानवी भावभावनांची गुंतागुंत आणि प्रयोगशीलता जपणाऱ्या मराठी चित्रपटांना यामुळे मोठी ऊर्जा मिळते. ‘डोंबिवली फास्ट’ पासून सुरू झालेला हा प्रवास‘फॅन्ड्री’, ‘किल्ला’, ‘आनंदी गोपाळ’ आणि अलीकडच्या‘स्थळ’ व ‘बाप्या’ यांसारख्या दर्जेदार कलाकृतींपर्यंत येऊन पोहोचला आहे. या पुरस्कारामुळे मराठी चित्रपटांना केवळ आर्थिक पाठबळच मिळत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि महोत्सवांमध्ये मानाचे स्थानही प्राप्त होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!