शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील रिक्षाचालक आणि रिक्षामालकांच्या रोजगारावर बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवांमुळे परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजीज नवाब शेख यांनी आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देऊन बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवा तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रात लाखो रिक्षाचालक आणि रिक्षामालक रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शासनाचे नियम आणि आवश्यक परवान्यांचे पालन करून ते प्रवाशांना वाहतूक सेवा देतात. मात्र, बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवांमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असून त्यांच्या उत्पन्नात घट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी अनेक रिक्षाचालक कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवांची तपासणी करावी, नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि अशा सेवा बंद करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी मागणी अजीज शेख यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी रिक्षाचालकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. रिक्षाचालक-मालकांना न्याय मिळवून देऊन त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करावे, अशी विनंतीही करण्यात आली.
यावेळी वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजहर खान उपस्थित होते.




Total Users : 243522