शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’ला उत्साहात सुरुवात झाली. या पर्वांतर्गत एकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय कार्यक्रमासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भक्ती शक्ती चौक ते निगडी उड्डाणपूल- काचघर-भेळ चौक – अशा मार्गानै एकता दौडचा समारोप भक्ती शक्ती चौक येथे झाला.
एकता दौड सुरू करण्याआधी सर्वानी “भारत माता की जय” अशा घोषणा करीत देशभक्तीमय वातावरण निर्माण केलै होते तसेच सर्वांनी “आम्ही,सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, आम्ही राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करू आणि आमच्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू. आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाली आहे. तसेच आम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता आमचे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत.” अशी राष्ट्रीय एकतेची शपथ घेत देशात एकता व अखंडता राखण्याचा निर्धार केला.शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकता आणि अखंड भारताच्या निर्मितीतील योगदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात क्रीडा,कला व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे,माजी नगरसदस्य नामदेव डाके, उप आयुक्त पंकज पाटील,सह शहर अभियंता बापू गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सायंकाळी ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर प्रा.महिपतराव ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेहोते, त्यामध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचे आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. त्यानंतर निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त पंकज पाटील यांच्या अधिपत्याखाली क्रीडा विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




Total Users : 235648