spot_img
spot_img
spot_img

आर्या कांबळे हिला ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करा; आमदार अमित गोरखे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड येथील चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीत नुकत्याच घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता 60 ते 70 रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या 20 वर्षीय साहसी तरुणी आर्या कांबळे हिला राज्य शासनाने अधिकृतपणे ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करावा, अशी आग्रही मागणी भाजप विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नेमकी घटना काय आहे?
चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये 29 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे साधारण 2 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत 17 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने जळून खाक झाली. मध्यरात्रीच्या वेळी अचानक पसरलेला दाट धूर आणि आगीच्या ज्वाळांमुळे इमारतीमधील 60  ते 70 रहिवासी गाढ झोपेत असताना संकटात सापडले होते.

आर्याचे असीम धाडस आणि प्रसंगावधान
अशा बिकट आणि जीवघेण्या प्रसंगात अवघ्या 20 वर्षांच्या आर्या कांबळे हिने अभूतपूर्व धाडस आणि संयम दाखवला. घराचे दार उघडत नसतानाही तिने न घाबरता सर्वप्रथम अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. या उडीमुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली; मात्र स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती संपूर्ण इमारतीत धावली. गाढ झोपेत असलेल्या सर्व रहिवाशांना जागे करून सुरक्षितपणे गच्चीवर (टेरेसवर) जाण्याचे निर्देश दिले आणि सर्वांचे प्राण सुखरूप वाचवले.

आर्याच्या साहसाची शासनाने दखल घ्यावी
‘आर्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता दाखवलेले हे अतुलनीय शौर्य आणि समयसूचकता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी तसेच राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिच्या या साहसामुळे मोठा अनर्थ टळला असून 60 ते 70 नागरिकांना नवीन जीवन मिळाले आहे. या प्रेरणादायी आणि साहसी कृत्याची शासनाने तात्काळ नोंद घेऊन आर्या कांबळे हिला ‘शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करावे,’ असे आमदार अमित गोरखे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.  

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!