spot_img
spot_img
spot_img

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच उपाययोजना कराव्यात!

वाहन धुणाऱ्यांना एक हजारांचा दंड, पाणी गळती रोखण्यासाठी फिरते पथक; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 शहरातील संभाव्य पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी वाहन धुण्यावर आणि घरासमोरील अंगण, फरशी पाण्याने धुण्यावर निर्बंध घालावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एक हजार रुपयांचा दंड आकारावा, तसेच पाणी गळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे, अशा विविध मागण्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक झाली असून, वाढते शहरीकरण आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरनंतर आणि दिवाळीच्या कालावधीनंतर पाणीटंचाईचे परिणाम अधिक जाणवू शकतात, अशी चिंता भोईर यांनी व्यक्त केली आहे. संभाव्य संकटाची पूर्वकल्पना घेऊन प्रशासनाने वेळेत नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पाणी गळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक

शहरातील घरे, व्यावसायिक इमारती आणि कार्यालयांमधील नळ तसेच पाइपलाइनमधून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे. नागरिकांनी मागणी केल्यास नाममात्र शुल्कात किंवा मोफत गळती दुरुस्त करून देण्याची सुविधा उपलब्ध करावी. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येईल, असे भोईर यांनी सुचविले आहे.

वाहन धुणाऱ्यांवर एक हजारांचा दंड

पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासाठी होऊ नये, यासाठी महापालिकेने कठोर नियम लागू करावेत. कार, दुचाकी आणि इतर वाहने पाण्याने धुण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसण्याचे आवाहन करावे. तसेच घरासमोरील अंगण, फरशी आणि पटांगण पाण्याने धुण्यावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच किमान एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात यावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नवीन बांधकामांच्या पाणी वापरावर नियंत्रण

संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून शहरातील नवीन मोठ्या बांधकामांच्या पाणी वापरावर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. शहरातील सार्वजनिक आणि खासगी विहिरी तसेच बोअरवेल यांचे व्यवस्थापन महापालिकेने आपल्या नियंत्रणाखाली घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

गरजूंसाठी झुणका-भाकर केंद्र सुरू करा

पाणीटंचाईच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक आणि कष्टकरी वर्गाला अन्नाची समस्या भेडसावू नये, यासाठी महापालिकेने सेवाभावी संस्थांना आर्थिक तसेच पायाभूत मदत करावी. शहरात गरजू नागरिकांसाठी माफक दरात भोजन उपलब्ध करून देणारी झुणका-भाकर केंद्रे किंवा तत्सम अन्नछत्र सुरू करावीत, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.

दर १५ दिवसांनी पाणी व्यवस्थापनाचा आढावा

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा साठा, वितरण व्यवस्था आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पाणी व्यवस्थापन समिती गठित करावी. या समितीची दर १५ दिवसांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती

पाणी बचतीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत भोईर यांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. घरातील फ्लश टँकचा अनावश्यक वापर टाळणे, शॉवरऐवजी बादलीतील मोजक्या पाण्याने स्नान करणे आणि भांडी धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर झाडे व बागांसाठी करणे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. तसेच पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांकडून व्यावहारिक आणि उपयुक्त सूचना मागवाव्यात, असेही त्यांनी सुचविले आहे.

सजग नागरिक म्हणून प्रशासनाला साकडे

“विरोधी पक्षनेता म्हणून नव्हे, तर एक सजग नागरिक म्हणून संभाव्य पाणीटंचाईची जाणीव आणि नागरिकांच्या हिताची तळमळ लक्षात घेऊन या सूचना मांडत आहे,” अशी भूमिका भाऊसाहेब भोईर यांनी पत्रातून मांडली आहे.

महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईच्या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देऊन सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. संभाव्य संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. आता महापालिका प्रशासन या सूचनांवर काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!