शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठ्याचे नियोजन करण्याबाबत गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) विधानभवन, पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. या बैठकीत मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा, शेती सिंचन आणि उपलब्ध जलसाठ्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
मावळ तालुक्यातील पवना, इंद्रायणी आणि आंद्रा नदीकाठच्या गावांना आवश्यक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी या नद्यांवरील नादुरुस्त कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत सर्व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, तसेच धरणांमधून वेळोवेळी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यासाठी नियोजन केले जाईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय, जुलै २०२७ पर्यंत मावळ तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक असलेला उपयुक्त पाणीसाठा आरक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या नियोजनामुळे आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापनाला दिशा मिळणार आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांमधील पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनाची गरज लक्षात घेऊन बंधाऱ्यांची दुरुस्ती व जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, सध्या एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनिश्चिततेची आणि दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीसाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मावळ तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि संबंधित यंत्रणांनी पाणी बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.




Total Users : 234668