spot_img
spot_img
spot_img

वाकडमधील भगवती रॉयल सोसायटीचा पाणीबचतीचा निर्धार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पारंपरिक धार्मिक उत्सवाला सामाजिक भानाची जोड देत वाकड-थेरगाव येथील भगवती रॉयल हौसिंग सोसायटीमध्ये कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून सोसायटीतील रहिवासी आणि लहान मुलांनी पाणीबचतीचा संदेश देत जलजागृतीचा संकल्प केला. विशेष म्हणजे, पाण्याची वाढती गरज आणि टँकरवरील वाढता खर्च लक्षात घेऊन सोसायटीने आता प्रत्यक्ष कृतीतून पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यंदाच्या कोजागरी पौर्णिमा उत्सवात व्यावसायिक केटरर्सऐवजी सोसायटीतील स्वयंसेवक आणि रहिवाशांनी एकत्र येत घरगुती मसाला दूध तयार केले. सामूहिक सहभागातून उत्सव साजरा करताना स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी आयोजित विविध उपक्रमांतून पाण्याचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारणाची गरज याविषयी जनजागृती करण्यात आली.

उत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर पवार, उपाध्यक्ष उमेश पेंडभाजे, खजिनदार चिंतन कंसारा यांच्यासह सुनील आचरे, अमोल पाटील, मनोज चौधरी, सतीश कोलगे, अमोल वाघ, प्रभाकर कुमार आणि मयंक अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

टँकरवरील खर्च कमी करण्यासाठी नियोजन

सोसायटीचे रहिवासी योगेश पाटील यांनी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षभरात पाण्याच्या टँकरवर झालेल्या मोठ्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी रहिवाशांना मार्गदर्शन करणारे माहितीपत्रकही तयार करण्यात आले आहे. सध्याची पाण्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने पाणीबचतीला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

केवळ व्हॉट्सॲपवर संदेश पाठविणे किंवा समाजमाध्यमांवर जनजागृतीचे संदेश प्रसारित करणे पुरेसे नाही. ही जागरूकता प्रत्यक्ष कृतीत उतरली पाहिजे, अशी भूमिका योगेश पाटील यांनी मांडली. डिजिटल माध्यमांवरील जनजागृती प्रत्यक्ष जीवनात अमलात आली, तरच पाणीबचतीच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील आठवड्यापासून घरोघरी प्रबोधन

पाणीबचतीचा संदेश प्रत्येक रहिवाशापर्यंत पोहोचविण्यासाठी भगवती रॉयल सोसायटीतर्फे पुढील आठवड्यापासून ‘डोअर-टू-डोअर’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सोसायटीचे स्वयंसेवक प्रत्येक घरात जाऊन पाण्याचा योग्य वापर कसा करावा, दैनंदिन कामांमध्ये पाण्याची बचत कशी करता येईल आणि नळ किंवा पाइपलाइनमधील गळती कशी रोखावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, लहान-लहान सवयींमधील बदलातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे केवळ जनजागृती न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा निर्णय सोसायटीने घेतला आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत पर्यावरणविषयक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न भगवती रॉयल सोसायटीने केला आहे. पाणीबचतीचा हा संकल्प केवळ सोसायटीपुरता मर्यादित न राहता परिसरातील इतर नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!