spot_img
spot_img
spot_img

‘वायसीएम’मध्ये औषधटंचाईबाबत पुरठादार, उत्पादक कंपनी ‘ब्लॅक लिस्ट’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती अर्थात वायसीएम रुग्णालयात काही काळ औषधांची कमतरता होती आणि त्यामुळे काही रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात होते, अशी स्पष्ट कबुली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत प्रतिकूल अहवाल आल्यानंतर एका पुरवठादाराचा पुरवठा थांबविण्यात आला. तसेच, उत्पादक कंपनीला काळ्या यादी टाकण्यात आले आहे. पर्यायी पुरवठ्याच्या प्रक्रियेदरम्यान तुटवडा निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या मात्र औषधपुरवठा सुरळीत असल्याचा दावा विभागाने केला आहे.

नगरसेवक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली बंडू तात्या जगताप यांनी वायसीएममधील औषधांच्या कमतरतेबाबत २२ सप्टेंबर २०२६ रोजी पत्र दिले होते. त्याला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी उत्तर देत औषधसाठा, खरेदी, वितरण आणि पुरवठादारांवरील कारवाईचा खुलासा केला आहे.

अन्न व औषध प्रशासनामार्फत झालेल्या तपासणीत एका निविदाधारकाने पुरविलेली काही औषधे प्रमाणित गुणवत्तेची नसल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर संबंधित पुरवठादारावर प्रतिबंध घालण्यात आले आणि औषध उत्पादक कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

संबंधित पुरवठादार महापालिकेच्या रुग्णालयांना २३९ प्रकारची औषधे पुरवत होता. त्याच्याकडून नियमित लागणाऱ्या ७० ते ८० औषधांचा पुरवठा अचानक थांबल्याने पर्यायी व्यवस्था करावी लागली. निविदेतील पुढील पात्र निविदाधारकांना आदेश दिल्यानंतर पुरवठ्यासाठी अटींनुसार ३० दिवसांची मुदत असल्यामुळे दोन ते तीन आठवडे काही औषधांची कमतरता निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, तसे लेखी उत्तर आरोग्य विभागाचे प्रमुख लक्ष्मण गोफणे यांच्या स्वाक्षरीने दिले आहे.

रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याचे मान्य

औषधटंचाईच्या काळात काही रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात होते, ही वस्तुस्थिती असल्याचे आरोग्य विभागाने लेखी उत्तरात मान्य केले आहे. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून उपलब्ध औषधांमधून उपचार देण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या निविदेतील औषधयादीत समाविष्ट औषधेच लिहून देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्याचेही पत्रात म्हटले आहे. मात्र, अत्यंत गंभीर रुग्णांना विशेष उपचारासाठी तातडीने आवश्यक असलेली आणि निविदेत नसलेली औषधे अपवादात्मक परिस्थितीत लिहून देणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक ठरते, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

विलंब करणाऱ्या पुरवठादारांकडून दंडवसुली

काही पुरवठादारांकडून होणाऱ्या विलंबाबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावून निविदेतील अटींनुसार दंड वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे औषधांच्या कच्च्या मालाचा तुटवडा आणि दरवाढ झाल्याने पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे कारणही पत्रात नमूद करण्यात आले आहे. औषधांच्या नियमित खरेदीसाठी २१ निविदाधारकांकडून ६२६ प्रकारची औषधे घेतली जातात. तातडीच्या खरेदीसाठी स्वतंत्र तीन निविदाधारकांची व्यवस्था असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

तक्रार निवारणासाठी मदत कक्ष प्रस्तावित

वायसीएमसह महापालिकेच्या रुग्णालयांतील उपलब्ध औषधांची अद्ययावत यादी वैद्यकीय अधिकाऱ्यांना संगणकीय व भौतिक स्वरूपात दिली जाते. मध्यवर्ती औषध भांडारातील साठा ‘एसएपी’ प्रणालीद्वारे संबंधित फार्मासिस्टना पाहता येतो, असे प्रशासनाने नमूद केले आहे. औषध वितरणाबाबत अडचण आल्यास रुग्णांनी रुग्णालयप्रमुख किंवा औषध वितरण विभागातील फार्मासिस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व रुग्णालयांच्या स्तरावर कै. लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप मदत कक्ष सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहितीही पत्रात देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सर्व रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा असून भविष्यात तुटवडा भासू नये यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले आहे.

“वायसीएममध्ये औषधटंचाई होती आणि काही रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागली, हे प्रशासनानेच लेखी मान्य केले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांवर औषधखरेदीचा अतिरिक्त भार पडणे योग्य नाही. पुरवठ्यातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करून दर्जेदार औषधांचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करावा. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याचा मी आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”

– ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, नगरसेवक, भाजपा.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!