शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि थायलंडमधील व्यापार व उद्योग सहकार्य अधिक व्यापक
करण्यासाठी कृषी-प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाल्याची आयात-निर्यात आणि थाई कंपन्यांची राज्यातील
गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
थायलंडच्या महावाणिज्यदूत सिरिपरन सुपनिलमीतविसेतकुल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री
रावल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री रावल यांनी राज्याची कृषी उत्पादन क्षमता लक्षात
घेऊन थायलंडच्या कृषी-प्रक्रिया उद्योगांचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात आणण्याची संधी असल्याचे सांगितले.
लिंबू, डाळिंब तसेच अन्य फळे व भाजीपाल्याच्या आयात-निर्यातीला चालना देण्याच्या शक्यतांवरही
यावेळी चर्चा झाली.
महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या थाई कंपन्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या
निराकरणासाठी परस्पर संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला. पर्यटन, विद्यार्थी
देवाणघेवाण, थाई युवकांसाठी हिंदी भाषा शिक्षणाच्या सुविधा आणि हिंदी चित्रपटांचे थाई भाषेत डबिंग
या माध्यमांतून परस्पर संबंध वाढविण्याबाबतही विचारविनिमय झाला.
थायलंडच्या राजकन्या सिरिवन्नवरी यांच्या नियोजित महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा झाली. या
दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर, अजिंठा-वेरूळ लेणी, मुंबईतील संग्रहालय आणि घारापुरी बेटाचा समावेश
करण्याची सूचना मंत्री रावल यांनी केली.




Total Users : 233922