नागपूर | प्रतिनिधी
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची वार्षिक बैठक नागपूर येथे संपन्न झाली. या बैठकीस सोसायटीचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबईतील वडाळा येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जागेवर भव्य ‘सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे प्रतिनिधिक सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे नवनियुक्त विश्वस्त मा. अण्णा बनसोडे यांनी विश्वस्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सोसायटीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने सुरुवात केली आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांसह नवोदित खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रस्तावित सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भव्य क्रिकेट स्टेडियम, ५० पेक्षा अधिक खेळांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा, ३,५०० प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले सभागृह, तीन उपहारगृहे, क्रीडा साहित्याची दुकाने तसेच खेळाडूंच्या निवासासाठी २०० निवासांची व्यवस्था प्रस्तावित आहे.
या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे, नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना पुढे नेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रस्तावित सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे मुंबईतील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांना आणि उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




Total Users : 233922