spot_img
spot_img
spot_img

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह विविध उपक्रमांच्या कार्याचा आढावा मांडणाऱ्या ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या डिसेंबर २०२४ पासूनच्या कामकाजाचा आढावा या कॉफी टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. कक्षाच्या कार्याची ओळख, उद्देश, कार्यपद्धती, विविध योजना, उपक्रम, लाभार्थ्यांना मिळालेली मदत आणि रुग्णांच्या यशोगाथा यांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. विविध योजनांचे स्वरूप, कायदे, नियम, लाभार्थी घटक, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती यात समाविष्ट आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना उपलब्ध योजनांची माहिती मिळण्यास आणि आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होणार आहे.

या कॉफी टेबल बुकमध्ये कक्षाच्या कामकाजाची आकडेवारी, विविध उपक्रम, जिल्हास्तरावर झालेला विस्तार, लोकसहभागातून मिळालेला प्रतिसाद तसेच मदत मिळालेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव कथन समाविष्ट करण्यात आले आहे. कक्षातील अधिकारी आणि मान्यवरांनी लिहिलेले लेख, संपादकीय मनोगत, शुभेच्छा संदेश आणि पूरक माहितीचाही यात समावेश आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कार्याची व्यापक स्तरावर ओळख निर्माण करणे, गरजू रुग्णांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि रुग्णसेवेत शासनाच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण करणे, हा या कॉफी टेबल बुकचा प्रमुख उद्देश आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!