शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात नागरिकांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक २८ मधील विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/११२ (खेळाचे मैदान – PG) या जागेतून १५ ते २० गुंठे जागा उपलब्ध करून देत २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.
पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. परिसरात मोठ्या निवासी इमारती आणि गृहप्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकसंख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. परिणामी, पाणीपुरवठ्यावरील ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यातील गरजांचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
परिसरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/११२ या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागेतून सुमारे १५ ते २० गुंठे जागा जलकुंभ उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारल्यास पिंपळे सौदागरमधील नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलकुंभाची उभारणी झाल्यास भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी पाण्याची गरज भागविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे संबंधित जागेची पाहणी करून नियमानुसार आवश्यक मंजुरी आणि तांत्रिक कार्यवाही पूर्ण करावी, तसेच जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक आदेश द्यावेत, अशी विनंती विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.




Total Users : 232614