शबनम न्यूज | प्रतिनिधी
सम्राट अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध धम्मीय सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पहिली ‘धम्म पहाट’ बुद्ध-भीम गीतांच्या संगीतमय मैफिलीने उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे शहर आणि परिसरातील धम्मबांधव, भगिनी, तरुण-तरुणी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांनी सादर केलेल्या सुरेल बुद्धगीतांनी आणि भीमगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या प्रभावी गायनामुळे संपूर्ण परिसर बुद्धमय आणि भीममय झाला. गीतांच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचा करुणा, मैत्री, समता आणि बंधुतेचा संदेश, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. संगीतमय गीतांच्या माध्यमातून बुद्ध-भीम विचारांना उजाळा देणारी ही धम्मपहाट उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाने सामाजिक समता, बंधुता आणि धम्मविचारांच्या प्रसाराचा संदेश दिला. बुद्धगीतांच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तर भीमगीतांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
बौद्ध धम्मीय सेवा संघाच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘धम्म पहाट’ कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांमुळे बुद्ध-भीम विचारांचा प्रसार होण्यासोबतच नव्या पिढीमध्ये धम्मसंस्कार रुजण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक निलेशभाऊ आल्हाट, नगरसेवक हिमानीताई कांबळे, माजी उपमहापौर सुनीताताई परशुराम वाडेकर, शैलेश चव्हाण, संजय सोनवणे, महीपाल वाघमारे, अशोक शिरोळे, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले, एस. बी. एन. ग्रुपचे अध्यक्ष सोनूभाऊ निकाळजे, प्रशांत कसबे, वसंतदादा साळवे, विलास वंनशिव आणि किशोर रिकबे उपस्थित होते.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पुणे शहर अध्यक्ष राजरत्न थोरात, समता सैनिक दलाचे कमांडर अनिल कांबळे, अनिल सोनवणे, बसपाचे नेते किरण आल्हाट, संविधान ग्रुपचे सचिन गजरमल, राकेश सोनवणे, युवारत्न सेवा समितीचे अध्यक्ष सचिन वाघमारे, किशोर कांबळे, बामसेफचे शंतनू भेंगळे, वेसाक फाऊंडेशनचे राहुल बनसोडे, प्रा. प्रकाश पवार, प्रा. मिलिंद निकाळजे, प्रशांत सोनवणे, सतीश साबळे, सर्जेरावभाऊ वाघमारे, हणमंत आण्णा पपुल, आकाश कांबळे, हंसराज खुणे आणि कमलेश चाबुकस्वार यांच्यासह विविध सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विवेक बनसोडे, सतीश गायकवाड, युवराज बनसोडे आदींनी केले होते. बुद्ध-भीम गीतांच्या स्वरांनी आणि धम्मविचारांच्या जागराने पहाटेचे वातावरण मंगलमय झाले. या पहिल्याच उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद आयोजकांसाठी उत्साहवर्धक ठरला.




Total Users : 232622