spot_img
spot_img
spot_img

राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण व देखभाल करून शैक्षणिक वातावरण अधिक पोषक करण्यात येणार आहे.

शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे चालना मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.

ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक घेऊन शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करण्यात येईल. शाळेतील वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि क्रीडांगणाची पाहणी करून स्वच्छता, दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामांचा शाळानिहाय कृती आराखडा तयार करण्यात येईल. तर, दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष कामे केली जातील. वर्गखोल्या आणि विविध कक्षांसह फरशी, भिंती, दरवाजे, खिडक्या, छत व पंख्यांची सखोल साफसफाई करण्यात येईल. स्वच्छतागृहे, हात धुण्याची ठिकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाणीपुरवठा व्यवस्था स्वच्छ केली जाईल. शाळेचा परिसर, क्रीडांगण व प्रवेशद्वारातील कचरा आणि अनावश्यक वस्तू हटवून कचरा वर्गीकरणाची योग्य व्यवस्था तसेच डास, कीटक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण करणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील.

या मोहिमेत विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, फर्निचर, दरवाजे आणि खिडक्यांची पाहणी करून आवश्यक किरकोळ दुरुस्ती आणि देखभाल केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक विद्युत जोडणी, तुटलेले फर्निचर आणि असुरक्षित भागांची तातडीने दुरुस्ती करण्यात येऊन अनुपयुक्त किंवा निरुपयोगी साहित्याचे वर्गीकरण करून विहित कार्यपद्धतीनुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल.

मोहिमेतील सखोल साफसफाई, किरकोळ देखभाल, दुरुस्ती आणि अन्य अनुज्ञेय बाबींवरील खर्च शाळांना समग्र शिक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या एकत्रित अनुदानातून करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी किंवा निधी गोळा करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या भावनेतून या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच उपलब्धतेनुसार सीएसआर आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून मोहिमेच्या शाळास्तरीय अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!