नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचे महापालिकेच्या विद्युत विभागाला निवेदन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
किवळे गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनी उभारण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या सहशहर अभियंत्यांना निवेदन दिले असून, पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात विद्युत दाहिनीसाठी आर्थिक तरतूद करून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
किवळे गाव परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
सध्या पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करताना पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी विद्युत दाहिनी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे किवळे गावातील स्मशानभूमीत ही सुविधा उभारल्यास नागरिकांना सन्मानपूर्वक आणि सुलभ पद्धतीने अंत्यसंस्कार करता येतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्युत दाहिनीमुळे अंत्यसंस्काराची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासही मदत होईल. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमींमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे नगरसेविका तरस यांनी म्हटले आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात विद्युत दाहिनी उभारण्यासाठी निधीची तरतूद करावी आणि त्यानंतर आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.
आता महापालिका प्रशासन या मागणीची दखल घेऊन किवळे गावातील नागरिकांना आधुनिक अंत्यसंस्कार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 231652