spot_img
spot_img
spot_img

शांता शेळके यांच्या गीतांचा ‘बकुळगंध’ दरवळला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवयित्री, गीतकार आणि आपल्या शब्दप्रतिभेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शांताबाई शेळके यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘बकुळगंध संगीत संध्या’ या कार्यक्रमात गीत – संगीत, साहित्यिक आठवणी आणि भावभावनांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने निगडी पुणे येथील शांताबाई शेळके सभागृहात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शांताबाईंच्या अजरामर गीतांना स्वरांची साथ देत कलाकारांनी रसिकांच्या मनात आठवणींचा बकुळगंध दरवळला.
या कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे आणि उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ उपस्थित होते.
गायक कलाकार डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, अविनाश पाठक, गीता सुतार, आणि रिचा राजन यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून मैफलीला रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरवात रिचा राजन यांनी सादर केलेल्या ‘गजानना श्री गणराया’ या मंगलगीताने झाली. त्यानंतर ‘तोच चंद्रमा नभात’ , ‘हिची चाल तुरुतुरु’ , दाटून कंठ येतो’ , ‘ही वाट दूर जाते’ , ‘घन राणी घन राणी साजना’ , ‘माझे राणी माझे मोगा’ , ‘जीवन गाणे गातच रहावे’ , ‘शूर आम्ही सरदार’ , ‘शारद सुंदर’ , ‘मी डोलकर डोलकर’ आदी शांताबाईच्या एकाहून एक सरस गाण्यांनी मैफल रंगत गेली. तर भाऊसाहेब भोईर यांनीही सहभाग घेऊन ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ हे गीत सादर करून रसिकांना भावधुंद विश्वात नेले.
राजन लाखे यांनी शांताबाई शेळके यांच्याशी संबंधित आठवण सांगून शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील सहजता, साहित्यिक समृद्धी आणि त्यांच्या गीतांमागील भावविश्व उलगडले. गीतांच्या सादरीकरणाबरोबरच अशा आठवणींमुळे कार्यक्रमाला साहित्यिक संवादाचे स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाचा समारोप सर्व कलाकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीताने झाला. मराठी भाषेचा अभिमान, सांस्कृतिक अस्मिता आणि सामूहिक स्वरांचा उत्साह यांचा सुंदर मिलाफ या गीतातून अनुभवायला मिळाला.
‘बकुळगंध संगीत संध्या’ने याच चिरंतन गीतपरंपरेचा प्रत्यय दिला. कलाकारांच्या सुरेल आवाजांतून शांताबाईंचे शब्द पुन्हा जिवंत झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका जोशी यांनी केले तर कार्यवाह संजय जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.
किरण जोशी, इला पवार, किशोर पाटील, किरण जोशी, नीलिमा फाटक, श्रीकांत जोशी, अशोक होनराव, संजय होनकळस, आनंद यंकरस यांनी संयोजन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!