नगरसेवक संतोष कोकणे यांचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना निवेदन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ विजयनगर काळेवाडी मधील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना अनियमित आणि कमी दाबाने पाणी मिळत आहे. या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी नगरसेवक संतोष अंकुश कोकणे यांनी केली आहे.
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २२ विजयनगर काळेवाडी मधील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना नियमित वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. मात्र, पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवताना नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“प्रभाग क्रमांक २२ विजयनगर काळेवाडी मधील काळेवाडी व परिसरात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी नियमितपणे मिळालेच पाहिजे. या समस्येमुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, नागरिकांच्या हक्कासाठी महापालिका भवनावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल. नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळेपर्यंत आम्ही हा प्रश्न सातत्याने लावून धरू.”
— संतोष अंकुश कोकणे नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.




Total Users : 230629