शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने ‘शून्य कचरा कार्यालय’ या उपक्रमाची सुरुवात करून इतर कार्यालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर अशा पद्धतीने पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या मुख्य कार्यालयात ‘शून्य कचरा कार्यालय’ या उपक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासह कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य विल्हेवाट आणि पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी चिंचवड येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पालाही भेट देऊन तेथील प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाऊंडेशन अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीए प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर तसेच महापालिका कर्मचारी आणि लाईटहाऊस प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी शून्य कचरा कार्यालय उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही ही संकल्पना राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा आढावा घेत, रोजगाराच्या बदलत्या संधींनुसार प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्याबाबत सूचना केल्या.
शून्य कचरा कार्यालयातून पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला ‘शून्य कचरा कार्यालय’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करण्यास मदत होईल. या उपक्रमाचा आदर्श घेऊन महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त जंगम म्हणाले, युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी लाईटहाऊस प्रकल्प कार्यान्वित असून, युवकांना त्यांच्या आवडीनुसार विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असणे ही विशेष कौतुकाची बाब आहे. बदलत्या काळानुसार रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांपुरते मर्यादित न राहता ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक्स यांसारख्या आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे. यासोबतच युवकांना विविध परदेशी भाषांचे ज्ञान देणेही गरजेचे आहे. परदेशातील रोजगाराच्या संधींचा अभ्यास करून त्यानुसार प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास युवकांना जागतिक स्तरावर करिअरच्या अधिक संधी मिळू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.




Total Users : 230449