spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील प्रशासकीय इमारतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रांगणातील अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,अतिरिक्त आयुक्त कुलदिप जंगम,तृप्ती सांडभोर,विक्रांत बगाडे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे,मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले,सह आयुक्त मनोज लोणकर,शहर अभियंता मनोज सेठीया,मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,उप आयुक्त अण्णा बोदडे,सचिन पवार,व्यंकटेश दुर्वास,संदीप खोत,पंकज पाटील,सह शहर अभियंता बापू गायकवाड,विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी दत्ता सुर्यवंशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे,उपाध्यक्षा सुप्रिया जाधव,महादेव बोत्रे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचे स्मरण करत महापालिकेच्या लोकसेवेला यावेळी उजाळा देण्यात आला. औद्योगिक नगरीपासून आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरापर्यंतचा पिंपरी-चिंचवडचा प्रवास हा दूरदृष्टी, सातत्यपूर्ण विकासकार्य आणि नागरिकांच्या सहभागातून घडला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. वर्धापन दिनाचा आनंद साजरा करतानाच समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या आयोजनातून दिसून आला.

रस्सीखेच स्पर्धेतून संघभावनेचे दर्शन; पैठणीच्या खेळाने वाढवली रंगत वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांदरम्यान झालेली रस्सीखेच स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. स्पर्धकांनी दाखवलेला उत्साह, जिद्द आणि संघभावना यामुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. दैनंदिन प्रशासकीय कामकाजाच्या जबाबदाऱ्यांमधून काही क्षण विरंगुळ्याचे मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्पर्धांचा आनंद घेतला.

तसेच महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित पैठणीच्या खेळाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विविध खेळ आणि मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील स्नेहभाव, परस्पर संवाद आणि सांघिक एकोपा वृद्धिंगत होण्यास मदत झाली. वर्धापन दिनानिमित्त आयोजित या स्पर्धांमुळे महापालिका परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपल्या विकासप्रवासात नागरी सुविधा, पायाभूत विकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक सेवांच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शहराच्या गौरवशाली वारशाचे जतन करत बदलत्या काळानुसार आधुनिक सुविधा आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान अधिक उंचावण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!