spot_img
spot_img
spot_img

नाना पाटेकरांच्या निधनाने महाराष्ट्राने गमावले ‘चालते-बोलते विचारांचे विद्यापीठ’ – भाऊसाहेब भोईर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आपल्या अभिनयासोबतच परखड विचार, साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपणारे नाना हे महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेतील एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत पिंपरी-चिंचवडचे विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांपासून शौर्य, विचार आणि कर्तृत्वाची समृद्ध परंपरा निर्माण झाली. कला, साहित्य, समाजकारण आणि राजकारण या विविध क्षेत्रांत लता मंगेशकर, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांसारख्या दिग्गजांनी महाराष्ट्राची ओळख देशभर निर्माण केली. त्याच परंपरेतील अग्रगण्य नाव म्हणजे नाना पाटेकर, असे भोईर यांनी म्हटले आहे.

सामान्य कुटुंबातून संघर्ष करत आपल्या प्रतिभा, अथक परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रात उत्तुंग स्थान निर्माण केले. बॉलिवूडच्या झगमगाटात वावरतानाही त्यांनी माणुसकीचे भान कधीही सोडले नाही. प्रसिद्धी, संपत्ती आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांनी साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी कायम जपली.
महाराष्ट्रावर सामाजिक किंवा सांस्कृतिक संकट आले की परखडपणे भूमिका घेणारा कलावंत म्हणून नाना पाटेकर यांची वेगळी ओळख होती. पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका झाली असताना नानांनी घेतलेली ठाम भूमिका त्यांच्या निर्भीड स्वभावाचे उदाहरण आहे. आपली भूमिका मांडताना त्यातून कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा विचार न करता सत्याच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस नानांच्या व्यक्तिमत्त्वात होते, असेही भोईर यांनी नमूद केले.

नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कार्याला व्यापक स्वरूप दिले. मात्र, त्याआधीपासूनच त्यांनी अंध, अपंग, अनाथ आणि गरजू व्यक्तींना वैयक्तिक पातळीवर मदत केली. प्रसिद्धीपासून दूर राहून गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता.

“माझा नानांशी बऱ्याचदा संपर्क आला. ते नेहमी परखड शब्दांत बोलायचे. माझ्या तब्येतीची चौकशी करायचे आणि माझ्या कामाविषयी आपुलकीने विचारायचे. एका मराठी नटाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर कर्तृत्वाची किती उत्तुंग भरारी घ्यावी, याचे नाना पाटेकर हे मूर्तिमंत उदाहरण होते,” अशी आठवण भोईर यांनी व्यक्त केली.

नानांसोबत एका चित्रपटात काम करण्याचे आपले वैयक्तिक स्वप्न होते. मात्र, ते स्वप्न आता कायमचे अपूर्ण राहिले, याची खंत मनात सदैव राहील, असेही त्यांनी सांगितले.

“नाना पाटेकर यांच्या रूपाने महाराष्ट्रातील चालते-बोलते विचारांचे एक समृद्ध विद्यापीठ काळाच्या पडद्याआड गेले आहे. मात्र, खरा कलाकार कधीच काळाच्या पडद्याआड जात नसतो. आपल्या कला आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून तो सदैव जिवंत राहतो. नाना पाटेकरही आपल्या सर्वांच्या स्मरणात कायम अमर राहतील,” अशा भावपूर्ण शब्दांत भाऊसाहेब भोईर यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!